अत्यंत कृश शरीरयष्टी असलेला यश त्याच्या आईबरोबर आला होता. अंगाने अशक्त असला तरीही चेहऱ्यावर प्रचंड उत्साह आणि आत्मविश्वास! त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नांना तत्परतेने उत्तर देण्याची इच्छाशक्ती स्पष्ट जाणवत होती आणि म्हणूनच मुलाखतीची सुरुवात त्याच्यापासूनच केली. यश विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत होता. ऑनलाईन सुविधा नसल्यामुळे तो शाळेत नियमितपणे हजर राहू शकत नव्हता. अशा परिस्थितीतही त्याच्या अद्ययावत ज्ञानाची आम्हाला कमालच वाटली! विज्ञान त्याचा सगळ्यांत आवडीचा विषय. त्याने नामवंत शास्त्रज्ञांची माहिती तर सांगितलीच पण विचारलेल्या इतर प्रश्नांचीसुद्धा अचूक उत्तरे दिली. गणिताबद्दलही त्याला विशेष आकर्षण असल्याचे जाणवते. गणितातील तर त्याचे विशेष आवडीचे पाढे, अधून-मधून विचारले असता त्याने अगदी अचूक सांगितले. इतर विषय देखील यशला आवडत असल्याचे त्याने सांगितले.त्याला मैदानाचे विशेष आकर्षण असल्याचे लक्षात आले. तो खेळाबद्दल बोलायला खूप उत्सुक होता. खेळाबद्दलची थोडी माहिती दिल्यानंतर त्याने, “आई मला खेळायला सोडत नाही. तुम्ही आईला सांगा ना” अशी आईबद्दल तक्रार केली.आईकडे प्रश्नार्थक नजरेने आम्ही पाहिले आणि आईची मुलाखत घेण्यास सुरुवात केली. पण आम्ही प्रश्न करण्याआधीच “यशला खेळायला पाठवण्यास माझा सक्त विरोध आहे”, असे त्या ठामपणे म्हणाल्या. आईने माहिती देण्यास सुरुवात केली. यशचे वडील एका बांधकाम उद्योजकाकडे कामाला आहेत व त्याची आई एका खासगी रुग्णालयात नर्सिंगचे काम करते. यशला दोन लहान भावंडे आहेत. दोन खोल्यांच्या भाड्याच्या घरात त्यांचे सहा जणांचे कुटुंब राहते. काही क्षण थांबून त्यांनी यशला बाहेर पाठवून दिले आणि मग त्या बोलण्याची मनोमन तयारी करू लागल्या.इतका वेळ यशच्या यशाने भरून गेलेले वातावरण एकदमच गंभीर झाले! क्षणभर शांतता पसरली. त्याच्या आईने सांगितले की त्याला हृदयाचा एक गंभीर आजार आहे. खूप औषधोपचार करूनही त्याला यश आले नाही. त्याच्या उपचारासाठी महिन्याला सहा ते आठ हजार रुपयांचा खर्च होतो आणि तो यातून पूर्णपणे बरा होण्याची शक्यता नसल्याचे त्यांना डॉक्टरांनी सांगितले आहे.  यशला या आजाराची काहीच कल्पना नाही नसल्याने तो लाडीकपणे आईची तक्रार आमच्याकडे करत होता. अशा गुणी यशला त्याच्या उरलेल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी ही फेलोशिप देण्यास काहीच हरकत नाही.