रोहनचा अर्ज समोर आला आणि त्याचा तपशील वाचायला मी सुरुवात केली. क्रमांक दोनचा मुद्दा–
अभ्यासाव्यतिरिक्त इतर कला गुण–
सहावी, सातवी,आठवी – डॉजबाल मध्ये प्रथम क्रमांक, कराटेची आवड ,कबड्डीची प्रचंड आवड, अभिनयामध्ये पुरस्कार ! वाचून असं वाटलं की रोहनच्या अर्जाचे केवळ रकाने भरलेत असं नाही तर त्याचं संपूर्ण जीवनच खेळामुळे परिपूर्ण झाल्यासारखं वाटतंय.
अर्जातील पहिला रकाना – वार्षिक परीक्षेतील गुण– शास्त्र आणि गणितामध्ये 93% ! अर्ज वाचताच रोहनची छबी मनात रेखाटली गेली आणि अगदी तंतोतंत तसाच रोहन समोर उभा राहिला! अतिशय उंच, देहयष्टी व्यायामामुळे आणि खेळामुळे एकदम fit !
रोहन आई बरोबर आला होता. मुलाखतीची सुरुवात रोहन पासूनच केली. अतिशय आत्मविश्वासाने तो उत्तरे देऊ लागला. पुढे त्याने त्याच्या करियर बद्दलच्या संकल्पना स्पष्ट आमच्या समोर मांडल्या.
त्याला Navy मध्ये जायचे आहे. त्याच्या साठी लागणारी सगळी माहिती त्याने यथावकाश सांगितली. नुसती सांगितली असे नाही तर त्याप्रमाणे त्याची तयारी देखील करत आहे हे जाणवले. अभ्यासाची आणि शारीरिक फिटनेस ची तयारी नित्य नियमाने करत आहे असे त्याने सांगितले आहे तर ते पडताळून पाहण्यासाठी तू जोर मारतोस का असे विचारताच, त्याने पटकन खुर्ची बाजूला सरकवून सलग वीस जोर मारून दाखवले! त्याच्या या झटपट कृतीमुळे वेगळीच छाप पडून गेली आणि त्याची ध्येय सक्ती सुस्पष्टपणे दिसली. अभ्यासातली गती सुद्धा ठळकपणे जाणवत होती. रोहन ज्या वस्ती मध्ये राहतो त्याचा कुठलाही विपरीत परिणाम त्याच्या विचारांवर झाला नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. म्हणजेच त्याची जिद्द आणि त्याचे लक्ष्य याचे कौतुक करावे तेवढे थोडेच !
रोहनच्या आईशी आता बोलायला सुरुवात केली, त्यांच्याकडून असे समजले की त्याचे वडील व्यसनामुळे सहा वर्षांपूर्वीच निवर्तले. त्याची आई घरकाम करून रोहनचे संगोपन करण्याची जबाबदारी पार पाडत आहे. रोहनची आजी व मामा अडीअडचणीला मदत करत असतात. अशा या अत्यंत हुशार, जिद्दी आणि जबाबदारीची जाणीव असलेल्या रोहनला फेलोशिप मंजूर करून त्याच्या भावी आयुष्याच्या स्वप्नपूर्तीसाठी नक्कीच हातभार लावायला हरकत नाही.
